सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते श्री.राहूल गोडसे यांचा सन्मान.
मंदिर समितीच्या दि.30/11/2023 रोजीच्या सभेत अभिनंदनाचा ठराव.
पंढरपूर प्रतिनिधी
मा.श्री.नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान भारत सरकार यांच्या दि.26/11/2023 रोजीच्या “मन कि बात” मध्ये “सबसे जादा मनपसंतीका फोटो” म्हणून मंदिर समितीचे फोटोग्राफर श्री.राहूल गोडसे यांच्या फोटोग्राफीचा उल्लेख केला होता. त्याबद्दल श्री.गोडसे यांचा दि.30/11/2023 रोजीच्या मंदिर समितीच्या सभेत अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला आहे. तसेच मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी मंदिर समितीचे सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवी निगडे तसेच कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके व व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानात, मेळा मोमेंट्स अंतर्गत सुरु झालेल्या सण आणि मेळाव्यांच्या प्रदर्शनात श्री.गोडसे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा व हुलजंती (मंगळवेढा) यात्रेतील फोटो सादर केले होते. या प्रदर्शनात देशभरातून 11000 फोटोग्राफरनी आपले फोटो सादर केले होते. यामध्ये पुरस्कार प्राप्त 60 छायाचित्रे आणि ज्युरी सदस्यांनी टिपलेली 22 सर्वोत्तम छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्यामध्ये श्री.गोडसे यांच्या तीन छायाचित्राची निवड झाली आहे. पुरस्कार प्राप्त छायाचित्रांची निवड, या क्षेत्रातील निष्णात छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या ज्युरींच्या पॅनलने केली आहे. मेला मोमेंट्स छायाचित्र स्पर्धेअंतर्गत - मेला व्हायब्स, चाटोरी गल्ली, मेला पोर्ट्रेट आणि मेला स्टॉल्स या चार श्रेणींमध्ये देशभरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी पाठवलेल्या 11000 प्रवेशिकांमधून ज्युरींनी 60 छायाचित्रे निवडली आहेत. मा. डॉ. मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक राज्यमंत्री यांच्या हस्ते ऑक्टोबर 2022 मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. ही स्पर्धा 1 ऑक्टोबर, 2022 ते 31 मार्च, 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
श्री.गोडसे हे मंदिर समितीकडे सन 2020 पासून फोटोग्राफर म्हणून सेवा देत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शासनाकडून दोन कला पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा “मन की बात” मध्ये मा.पंतप्रधानांनी उल्लेख केल्याने तिर्थक्षेत्र पंढरपूरचा लौकीक वाढला आहे.