पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
केंद्रसरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावांत पोहोचत असून, याव्दारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी सांगितले.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही ज्या नागरिकांना योजनांची माहिती नसल्याने लाभ मिळाला नाही त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळावा या उद्देशाने विकसीत भारत संकल्प यात्रेद्वारा शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यात येत आहे. यामध्ये शासनाच्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडीत दीनदयाल अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, भारतीय डाक विभागातील योजना या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यात येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रा 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरु असून, दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत नागरिकांमध्ये योजना बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक गावांत विकसीत भारत संकल्प यात्रेद्वारा उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन विविध लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याची पध्दत समाजावून सांगण्यात येणार आहे. तसेच संकल्प रथातल्या एलसीडी स्क्रीनवर ग्रामस्थांना माहितीपटही दाखवण्यात येत आहे. प्रत्येक गावांतील जास्तीत-जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग नोंदवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.