विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप व पालखीची नगर प्रदक्षिणा
। पंढरपूर, प्रतिनिधी
धन्य धन्य नामदेव। सकल वैष्णवांचा राव॥
भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव नामदेव महाराजांचा 673 वा संजिवन समाधी सोहळा संत नामदेव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रदक्षिणा रोडवरील विणे गल्ली येथील संत नामदेव मंदिरात संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकडा, भजन, किर्तन, प्रवचन, हरिजागर असे कार्यक्रम झाले. संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज व समस्त नामदास महाराज परिवाराच्यावतीने हा धार्मिक सोहळा पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत गुरुवार दि. 13 रोजी (आषाढ कृ. एकादशी) सकाळी 10 वाजता दिंडीची नगर प्रदक्षिणा झाली. शुक्रवार दि. 14 रोजी रात्री क्षीरापतीचा कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार दि. 15 रोजी (आषाढ कृ. 3) पहाटे 6 वाजता श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची महापुजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता ह.भ.प. माधव महाराज नामदास यांचे संत नामदेव महाराज यांच्या संजिवन समाधी सोहळ्यावरील किर्तन झाल्यानंतर दुपारी 1 वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर पवन धोकटे यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. तसेच नामदेव-जनाबाई असा गजर करत श्री विठ्ठलास जयंत कांबळे यांच्या हस्ते तर संत नामदेव पायरी येथे पांडुरंग पोरे यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. यानंतर समस्त पंढरपूर नामदेव शिंपी समाजाच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो वारकरी, भाविक व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यासाठी अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव विलास पोरे, खजिनदार शशिकांत जवंजाळ, जेष्ठ विश्वस्त जगन्नाथ म्हैंदरकर, राजेश धोकटे , संजय चांडोले, महेश गाणबोटे, अनंता पतंगे (म्हेत्रे), युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.
रविवार दि. 16 रोजी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नामदास महाराजांचे किर्तन झाले. सोमवार दि. 17 रोजी ह.भ.प. मुरारी महाराज नामदास यांचे काल्याचे किर्तन झाले. यावेळी केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती झाल्यानंतर काल्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता ‘ये ग ये ग विठाबाई’ हा अभंग म्हणून संत नामदेव महाराजांची पालखी दिंडी लवाजम्यासह नगर प्रदक्षिणेला निघाली. ठिकठिकाणी मानकर्यांचे अभंग म्हणत व टाळ-मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाई असा गजर करत संपूर्ण प्रदक्षिणा करण्यात आली. चंद्रभागेच्या पात्रातील भक्त पुंडलिक मंदिराजवळ अभंग म्हणण्यात आले. तसेच संत नामदेव पायरी येथे मानाचे अभंग म्हटल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर हा दिंडी सोहळा पुन्हा संत नामदेव मंदिरात आला. याठिकाणी नामदास महाराज परिवारातील सुवासिनी महिलांनी पालखीचे औक्षण केले. मंदिरात आल्यावर पुन्हा श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या मानकर्यांना श्रीफळ प्रसाद देण्यात आला. यानंतर समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा सोहळा साजरा करण्यासाठी सर्वश्री ह.भ.प. एकनाथ महाराज, विठ्ठल महाराज, हरी महाराज, केदार महाराज, मुरारी महाराज, निवृत्ती महाराज व नामदास महाराज फडावरील सेवेकर्यांनी परिश्रम घेतले.

