पळशी प्रतिनिधी
परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालून वारकरी व भागवत संप्रदायाचा अध्यात्मिक वारसा जतन करणारे,अवघ्या महाराष्ट्राला आपल्या भारुड कलेने परिचित व भुरळ घालणारे सुप्रसिद्ध सोंगी भारूडकार ह.भ.प.गोपाळ तात्या काटवटे महाराज (वय 76) यांचे अकस्मात व अनाकलनीय असे निधन झाल्याने पळशी व समस्त पंढरपूर परिसरातील वारकरी व अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना फार मोठा धक्का बसलेला आहे व तीव्र अशी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
भागवत सांप्रदाय व वारकरी सांप्रदायाची पताका सोंगी भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर पसरविणारे काटवटे महाराज काल सोनके या गावी संत सावता माळी महाराजांची पालखी आली असता पालखीतील वारकऱ्यांच्या साठी पंगत घालण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता या मध्ये काटवटे महाराज टाळ घेऊन उभे होते त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले व ते खाली बसले असता त्यांना तीव्र असा हृदय विकाराचा झटका आला व जागीच कीर्तन चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
सोंगी भारुड करण्यासाठी प्रसिद्ध असलेले ह.भ.प.गोपाळ तात्या काटवटे यांनी पळशी गावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवले. पळशी गावच्या रामेश्वर मंदिरात मागील २५ वर्षापासून ते अखंड हरिनाम सप्ताहाचे माध्यमातून भागवत संप्रदाय व वारकरी संप्रदायाची सेवा अविरतपणे करत होते. त्यांच्या पश्चात ३ मुले २ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

