तुंगत प्रतिनिधी
"शासन नियुक्त समितीच्या शिफारशीवरून गाईच्या दुधाला ३४ रुपये दर दिला असला तरी फॅट व 'एफएनएस'च्या रिटर्नचे दर दूध संघ चालकांनी मनमानी पद्धतीने वाढविले आहेत. यामुळे पूर्वीपेक्षा शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळेल. त्यामुळे शासनाची ही फसवी दूधदरवाढ असून, ही मनमानी थांबवावी. रिटर्नचे दर पूर्वीप्रमाणे ठेवावेत, या मागणीसाठी पंढरपूर सोलापूर रोडवर तुंगत येथे उद्या (ता. २९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
दुग्धजन्य पदार्थ, बटर व पावडरचे दर कमी झाल्याचे सांगत खासगी दूध संघ चालकांनी गाईच्या दुधाचे दर ३८-३९ वरून ३२ रुपयांवर आणले होते. त्यानंतर दूध दराबाबत निश्चिती करण्यासाठी शासनाने दूध व्यवसायातील जाणकारांची समिती नियुक्त केली.
या समितीच्या शिफारशीवरून गाईच्या दुधाला ३४ रुपये प्रतिलिटर दूध देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३.५ फॅट व ८.५ 'एफएनएस' असलेल्या दुधाला हे दर मिळतील. हे दर देतानाच खासगी दूध संघचालकांच्या संघटनेने मात्र त्यापेक्षा प्रत्येक कमी पॉइंटला १ रुपया कपात करण्याचे आदेश काढले. आधी ही कपात प्रत्येक पॉइंटला ३० पैसे होती. सध्याचे पावसाळ्याचे दिवस, हवामानातील आर्द्रता, हिरवा चारा यामुळे गाईच्या दुधाला ३.५ फॅट वव ८.५ एफएनएस लागत नाही. त्यामुळे रिटर्नचे दर वाढविल्याने वाढीव दर मिळण्याऐवजी उलट कमी दर मिळेल. मनमानी करून शेतकऱ्यांना कायम लुटणाऱ्यांनी दुधाचे दर पाडण्यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे. त्यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप 'स्वाभिमानी'ने केला.
ही फसवी दुध दरवाढ रद्द करून पूर्ववत ठेवावी. ३.५ फॅट व ८.५ एफएनएस ऐवजी ३.२ फॅट व ८. ३ एसएनएफ'ला निश्चित केलेला ३४ दर मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन होईल, असे रणदिवे म्हणाले.