मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
संत नामदेव महाराज यांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा नुकताच जोगेश्वरी नामदेव शिंपी मंडळाच्या वतीने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी नामदेव महारांजाच्या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा,विठूनमाचा गजर, कीर्तन, समाजबांधवांच्या गाटीभेटी त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाज बंधु भगिनींचा सत्कार आणि दहावी बारावी परीक्षेत उज्वज यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जोगेश्वरी सोडून इतरत्र राहावयास गेलेले अनेक बांधव सहपरिवार उपस्थित होते.जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष धुरंदर मिरजकर यांनी प्रास्तविक करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले.विशेष अतिथी म्हणून उवस्थित राहिलेले भाई मिरलेकर (जोगेश्वरी विधानसभा समन्वयक-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी नामदेव महाराज यांच्या विषयी सुंदर विवेचन करत मी जेव्हा एम ए मराठी विषय घेतला होता तेव्हा संत वाङमयात संत नामदेव महाराज अभ्यासाला होते असे आवर्जून सांगितले व संत कोण्या एका जाती धर्मासाठी काम करत नसतात तर संपूर्ण विश्वासाठी ते आपले योगदान देतात असे बोलले.ज्येष्ठ समाजबांधव वरुणकर यांचा ८५ वाढदिवस देखील यावेळी थाटामाटाने साजरा करण्यात आला.
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.सचिव गणेश विंचू यांच्या पुढाकाराने सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुदेश खटावकर यांनी केलं तर सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

