क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाणार
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हयातील सर्व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक तसेच स्कूलबस चे मालक व चालक यांनी स्कूलबस नियमावली 2011 च्या तरतुदीचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केले.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलीस आयुक्त सोलापूर शहर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. माने मार्गदर्शन करत होते. या बैठकीस पोलीस उपायुक्त अजित बोराडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर तसेच जिल्ह्यातील 187 शाळाचे मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते.
सोलापूर शहर पोलीस आयुक्त श्रीमाने पुढे म्हणाले की जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच स्कूल बस मालक व चालक यांनी राज्य शासनाने स्कूल बस नियमावली 2011 नुसार शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. त्या नियमावलीतील तरतुदीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या सर्व संबंधितावर पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येईल असे, त्यांनी निर्देशित केले.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्व शाळांनी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच सर्व शाळेच्या प्रमुखांना शाळेच्या आवारात हेल्मेट सक्ती करण्याबाबत श्री. माने यांनी सुचित केले.
सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा मधून क्षमतेपेक्षा जास्त संख्येने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर सोलापूर शहर वाहतूक शाखेतर्फे आता कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेने स्कूल बसची पार्किंग व्यवस्था सुनियोजित ठेवण्यास ठेवावी. तसेच स्कूलबस पार्किंगमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त श्री. बोराडे यांनी दिले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शालेय विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा कवच कक्षाची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी दिली. तसेच शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावेत याकरिता प्रत्येक शाळेने रस्ता सुरक्षा कक्षाला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. या कक्षाला जिल्ह्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन वाहतूक नियमावली ची माहिती घेतल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शाळेच्या प्रतिनिधींना www.schoolbussafetysolapur.org
व www.schoolsafetyakluj.org या दोन संकेतस्थळाबद्दल श्रीमती गायकवाड यांनी माहिती देऊन सर्वांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केल्यास विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे होण्यास मदत मिळेल. तसेच या संकेतस्थळांच्या माध्यमातून शाळांनी शालेय परिवहन समिती बाबतची माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध शाळांच्या प्रमुखांना रस्ता सुरक्षा कीट चे वाटप करण्यात आले.