आषाढी वारीतील सेवा सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सुलभ व जलद व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
आषाढी वारी कालावधीत भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबातचा आढावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. भक्त निवास येथे झालेल्या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन घेणारा भाविक वारकरी मुख दर्शन रांगेत खोळंबून राहतो. महापुजा कालावधीत मुखदर्शन सुरू राहिल्यास वारकरी भाविकांना त्याचा लाभ होईल. मुखदर्शन सुरू ठेवण्याबाबत आवश्यक उपाय योजना मंदिर समितीने करावी. यासाठी मंदिर समितीने व्हीव्हीआयपी यांना बसण्याचे ठिकाण, मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार याबाबत आवश्यक ते नियोजन करावे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर व्हीआयपी दर्शन होणार नाही. मात्र पारंपारिक दिंड्यांचे प्रथा परंपरेप्रमाणे दर्शन सुरू राहील याची दक्षता मंदिर समितीने घेवून आवश्यकती कार्यवाही करावी.
भाविकांना पालखी तळावर व मार्गावर प्रशासनाकडून आवश्यक सुविधा देण्यात आल्या असून, यामध्ये पालखी तळावर व मार्गावर प्रथमच महिलांसाठी स्नानगृह व वारकरी भाविकांसाठी विसावा मंडपाची सुविधा करण्यात आली होती. तसेच स्वच्छता, आरोग्य, शौचालय, शुद्ध, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आली होती. वारी कालावधीत महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. चंद्रभागा वाळवंट व आवश्यक ठिकाणी चेंजिंग रूम तयार कराव्यात. वारीत उभारण्यात आलेल्या शौचालयांमध्ये नियमित व पुरेसा पाणी साठा उपलब्ध करून द्यावा. शौचालयांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यापेक्षा अन्य काही उपाय योजना करण्याबाबत नगरपालिका व प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
तसेच भाविकांच्या सुविधेसाठी असणाऱ्या 65 एकर तसेच पारंपारिक जागा येणाऱ्या भाविकांना अधिकची जागा उपलब्ध व्हावी यासाठी पंढरपूर शहरालगत असणाऱ्या खाजगी जागा भाडे तत्त्वावर घेण्याबाबत प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरु करावी असेही पालकमंत्री विखे -पाटील म्हणाले.
आषाढी वारी कालावधीत वारकरी भाविकांना देण्यात येत असलेल्या सुविधा व केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी यावेळी दिली.