पंढरपुर प्रतिनिधी
डगर घाट ते इस्कॉन मंदिर चंद्रभागा नदी वरती पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून मुख्यमंत्री आषाढी एकादशी दिवशी इस्कॉन येथे येऊन या पुलाची घोषणा करतील अशी नागरिकांमधून चर्चा सुरू आहे. जर का हा पूल बांधला गेला तर या नदीवर ती उपजीविका करणारे महादेव कोळी जमातीचे अनेक लोक उध्दवस्त होणार आहेत. त्यामुळे या पुलाला महादेव कोळी समाजाचा तीव्र विरोध असल्याचे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले आहे.
सध्या चंद्रभागा नदी वरती 200 ते 300 होडी चालक होडी चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत असतात, जर का डगर घाट ते इस्कॉन मंदिर दरम्यान शासनाने पूल बांधला तर होडी चालक यांची उपासमार होणार आहे .त्यामुळे शासनाने हा पूल बांधू नये त्यास आमच्या समाजाचा तीव्र विरोध असल्याचे मत वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी बोलताना व्यक्त केले. या पुलामुळे होडी चालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे. तसेच महापुराच्या काळात हेच कोळी बांधव प्रशासनाला नेहमी मदतीचा हात पुढे करतात. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या अनेक भाविक भक्तांचे प्राण हे लोक वाचवले आहेत. तसेच नदीला वाळू चोरी व इतर चोऱ्यामाऱ्या होण्यापासून कोळी बांधव रक्षण करतात .अशा पद्धतीने प्रामाणिकपणे जनतेची भाविक भक्तांची सेवा करणाऱ्या महादेव कोळी समाज बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे हा पूल शासनाने बांधू नये शासनाने इथल्या कोळी समाज बांधवांना विश्वासात घ्यावे. अन्यथा कोळी बांधव या पुलाला तीव्र विरोध करतील असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.
तसेच शासन महादेव कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्या संदर्भात ही उदासीन आहे. हिवाळी अधिवेशनात ठरल्याप्रमाणे महादेव कोळी सह अन्यग्रस्त आदिवासी जमातीच्या जातीच्या दाखला प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मंडळ बैठक घेण्याचे मान्य केले असून ती बैठक लवकर घ्यावी .आदिवासी विभागाने 33 अन्यायग्रस्त आदिवासींच्या जमातींची बाबतीत खरी माहिती लपवून ठेवली असून खोट्या माहितीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत .त्यामुळे राज्यातील 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातीला न्याय मिळत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब हे अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी आघाडीवर असतात तर त्यांनी महादेव कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्नही प्राधान्याने सोडावा व चंद्रभागेतील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक लवकरात लवकर उभा करावे. व सदरचा पुल उभारण्यात येवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी होडी चालक मालक संघाचे अध्यक्ष सतीश नेहतराव, उत्तम परचंडे, गणेश तारापूरकर, नितीन अभंगराव, गणेश सलगरकर, अमर परचंडे, नंदकुमार नेहतराव, संजय अधटराव, दशरथ करकमकर, सोन्या अभंगराव, पिंटू टाकळकर, अप्पा करकमकर, सुरज कांबळे व इतर कोळी बांधव उपस्थित होते.