पंढरपूर प्रतिनिधी
अमरावती मधील सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ आणि ‘सृजन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान आयोजिलेल्या ‘डीपेक्स २०२३’ या प्रकल्प स्पर्धेमध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (डिप्लोमा) मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. स्वेरीतील संशोधनात्मक वातावरणामुळे पदवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे डिप्लोमामधील विद्यार्थी देखील विविध संशोधनपर उपक्रमात हिरीरीने सहभागी होतात आणि रिसर्च पेपर्स व रिसर्च प्रोजेक्टस च्या माध्यमातून आपल्या संशोधन गुणांना वाव देतात.
अमरावती येथे झालेल्या 'डिपेक्स २०२३' मध्ये राज्याच्या विविध विभागातून आलेल्या अभियांत्रिकीमधील एकूण १००० प्रकल्पांची नोंद झाली होती. निवड समितीने त्यामधून २५० प्रकल्प निवडले होते. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनामध्ये माहिती तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञान, ऊर्जा विभाग व आरोग्य विभाग अशा चार विविध प्रकारांमध्ये प्रकल्पांची विभागणी करण्यात आली होती.
त्यामध्ये ‘शेती तंत्रज्ञान’ या विभागांतर्गत स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामध्ये तृतीय वर्षात शिकत असलेले सार्थक संदीप जोशी, हर्षवर्धन दुशांत कुलकर्णी, निखिल सुनील सरवदे व प्रणव गोरख घाडगे या चार विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आणि शेतकऱ्यांना कांदा पात कापणीसाठी आवश्यक असलेल्या ‘सोलार ओनियन कटर’ या प्रकल्पाला तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेले बालाजी सुंदर थोरात, लोकेश नितिन चौधरी व अद्वैत अनिल गवसाने या विद्यार्थ्यांनी बनवलेला स्वयंचलित पाळणा ‘अॅटोमॅटिक बेबी क्रेडल’ या प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, प्रा.अविनाश सपकाळ, प्रा.शितल यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
पारितोषिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्याचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.