‘येत्या रविवार दि.३० एप्रिल रोजी ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ च्या निमित्ताने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.’ अशी माहिती पंढरपूर मधील ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे यांनी दिली.
रविवारी दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन पुण्यातील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, डॉ.शीतल मुकणे व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे विभागाच्या पशुसंवर्धन विभागातील सह आयुक्त डॉ.संतोष पंचपोर हे भूषविणार आहेत.
पहिल्या सत्रात पशुंमधील रक्त तपासणी निष्कर्ष व अनुमान याबाबत शंका-समाधानपर व्याख्यान होणार असून सांगलीचे विषयतज्ञ डॉ.विजय ढोके व माजी सह आयुक्त डॉ.महेश बनसोडे हे मार्गदर्शन करणार आहेत. लम्पीच्या कालावधीत राज्यातील पशुवैद्यकीय मंडळींनी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र कष्ट घेऊन पशूंना लम्पी या आजारापासून दूर ठेवले. पशुपालकांना दिलासा देवून राष्ट्रीय कर्तव्यपूर्ती केलेल्या पशु वैद्यकांचा ‘लम्पी योद्धा सन्मानपत्र’ देवून सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी साताऱ्यामधील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अंकुश परिहार, सोलापूरमधील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.भास्कर पऱ्हाडे, कराडमधील तालुका पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.दिनकर बोर्डे व सोलापूर जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवनगौरव पुरस्काराचे वितरणही केले जाणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहआयुक्त डॉ.सत्यवान भिंगारे, डॉ.प्रियांका जाधव-कोळेकर,मंगळवेढ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ब्रम्हदेव कदम, डॉ.तानाजी भोसले, पशुधन पर्यवेक्षक अविनाश रसाळे व पंढरपूरमधील पशुवैद्यक प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सचिव डॉ.अनिल सरदेशमुख यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकारी आदी परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे (मोबा.नं.-९५१८७१२९५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.