पंढरपूर प्रतिनिधी
ज्ञानदानासह इतर कार्ये करत असताना शिक्षिका आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या धकाधकीच्या जीवनात नकळतपणे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. हाच धागा पकडून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘शिक्षक विकास कार्यक्रम (फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम)’ सेल अंतर्गत महिला शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘मोफत आरोग्य तपासणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर पंचक्रोशीत अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या डॉ. बी.पी.रोंगे हॉस्पिटल तर्फे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांच्या सहकार्याने स्वेरीतील महिलांच्या आरोग्यासंदर्भातील विविध समस्यांची तपासणी व निराकरण करण्यात आले. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये स्त्रियांच्या मासिक पाळी, पाळीच्या तक्रारी व त्यावर उपाय, महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या, स्त्री वंध्यत्व, श्वेतपदर (अंगावरून पांढरे जाणे), गर्भाशयमुखाचा कॅन्सर, रजोनिवृत्ती, मेनोपॉज या सारख्या आजारांवर सल्ला-मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हिमोग्लोबिन तपासणी हाडांची (बीएमडी) तपासणी, गर्भाशयाची तपासणी या सोबत आवश्यकतेनुसार काही इतर तपासण्याही करण्यात आल्या. यामध्ये एचबीए १ सी, सीबीसी, टीएफटी, पॅप स्मिअर, लिपीड प्रोफाईल, लिक्विड बेस सायटोलॉजी, बीसीएल या तपासण्यांच्या समावेश आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी पंढरपूर मधील रोहन मेट्रो पॉलीसी लॅबोरेटरी व निदान लॅबोरेटरी मधील किरण सरवदे, वैभवी कोकाटे, संतोष पवार तसेच इतर आरोग्य सेविकांनी बहुमोल सहकार्य केले.
हे आरोग्य शिबीर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या समन्वयिका प्रा.एम.एम. भोरे यांच्या नेतृत्वाखाली अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व प्राध्यापिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्वेरी अभियांत्रिकीच्या जवळपास १३० प्राध्यापिका व महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला.