स्वेरीत महात्मा फुले यांची १९६ वी जयंती साजरी
पंढरपूर प्रतिनिधी
‘शिक्षणाचे जनक असलेल्या फुले दांपत्यामुळेच आज शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक बदल दिसून येत आहेत. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळेच आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य खूप महान आहे आणि ते कधीच विसरता येणार नाही. आज समाजात कोठेही भाषण असो अथवा शैक्षणिक सभा असो, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव हमखास निघते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने महात्मा जोतिबा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य अविस्मरणीय असे आहे.’ असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ.एन.बी.पासलकर यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रेरक आणि जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या १९६ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ.पासलकर आपले विचार मांडत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून शिक्षण क्षेत्रात महात्मा फुले यांचे योगदान अमुल्य आहे’ असे सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना डॉ.पासलकर म्हणाले की,‘थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्याकडून आपल्याला सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी स्फूर्ती मिळते. त्यांचे कार्य लक्षवेधी असून त्यांनी समाज सुधारण्यासाठी जीवन वेचले म्हणून प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण देत असताना 'आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो' ही भावना जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. फुले यांच्या योगदानामुळे आज समाजात स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत.’
यावेळी इनोव्हेशन सेलचे डॉ.पद्माकर केळकर, प्रा. सुदर्शन नातू, प्रा.अतुल मराठे, प्रा.रमेश अडवी, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम.एम पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.