मायणी प्रतिनिधी
मायणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १३व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन गुरुवार दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी येथील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. द. ता. भोसले, साहित्यिक वसंत केशव पाटील, कवी प्रमोद कोपर्डे, लेखिका नीलम माणगावे, कवी एकनाथ पाटील, कवी गोविंद पाटील, ज्येष्ठ अभ्यासक प्रा. बाबुराव गुरव आदी मान्यवरांची निवड करण्यात आली होती. मायणी पंचक्रोशीतील नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते, अशी माहिती समन्वयक कवी प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी दिली. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिव सुधाकर कुबेर, उपाध्यक्ष बाळकृष्ण विभूते, इतर संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संमेलनात 'तमाशा : लोकरंजन आणि प्रबोधनाची कला' या विषयावर विशेष साहित्य चर्चा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर (पलूस) हे मार्गदर्शन करणार आहेत. शाहीर हरिभाऊ गळवे (आटपाडी) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी ज्ञानेश डोंगरे (चोपडी) हे करणार आहेत. कविसंमेलनामध्ये कवी किरण अहिवळे (फलटण), सोपान शिंदे (चितळी), विठ्ठल भागवत (विटा), शाहीर नारायण कदम (धोंडेवाडी), महेश मोरे (निमसोड), आनंद बागल (कातरखटाव), बाळासाहेब कांबळे (मायणी), सौ. रंजना सानप (मायणी), सौ. अंजली गरवारे (मायणी), सौ. अनुराधा गुरव (वडूज) सौ. वंदना लिपारे(मायणी), सुहानी देशमुख (निमसोड), डॉ. हेमांगिनी माने (विटा), प्रकाश भोंगाळे (मायणी), प्रकाश शिंदे (विटा), प्रदीपकुमार भांदिर्गे (मोराळे) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शिवशंकर माळी, शिविमचे अध्यक्षव प्रा. डॉ. शौकतअली सय्यद कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत. सकाळी नऊ ते एक या वेळेत होणाऱ्या या संमेलनास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.