पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास वेळेत मदत झाल्यास अपघातग्रस्तास जीवदान मिळु शकते. अशाच प्रकारे दुचाकी घसरून सोलापूर कडून मेडशिंगी सांगोला येथे जाणाऱ्या बंडोपंत गोरख आसबे रा.मेडशिंगी, सांगोला यांचा कामती गावानजीक महामार्गावरील वळणावर अपघात घडला.
यावेळी प्रसंगावधान व र्कार्यतत्परता दाखवत आरटीओ वायुवेग पथकाच्या कर्तव्यावर निघालेले मोटार वाहन निरीक्षक सुखदेव पाटील, मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल नाझीरकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमृता देशमुख, वाहन चालक प्रमोद महाडिक यांनी सदर जखमीस रुग्णवाहिका येईपर्यंत वेळ न दवडता त्वरित आर टी ओ चे शासकीय वाहन MH04 KR 6458 मध्ये बसवून प्राथमिक आरोग्य केंद्र कामती तालुका मोहोळ येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी कामती पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी मोलाची मदत केली.
जखमीला वेळेत उपचारासाठी रुग्णवाहिकेची वाट बघत न बसता , स्वतःच्या शासकीय वाहनातून पाठवून उदात्त कर्तव्यभावनेने देवदूत ठरलेल्या आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सुखदेव पाटील, मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार, कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने आणि माऊली भोसले, तुळशीदास गायकवाड, अमोल सपकाळ या स्थानिक लोकांनी मदत केली. अधिकाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल कामती गावच्या ग्रामस्थांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.