मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई संचालित बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळे मध्ये मंगळवार दिनांक २८ मार्च, २०२३ रोजी युवा अनस्टॉपेबल संस्थे मार्फत ४० विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरण करण्यात आले. . प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण आणि डिजिटल साक्षरता मिळावी यासाठी या संस्थेने शाळेला यापूर्वी ३ स्मार्ट रूम व १५ लॕपटाॕप सहीत प्रोजेक्ट मॕनेजर सौ. मनाली करंजेकर यांच्या माध्यमातून नियमित मोफत प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याने डिजिटल युगातील प्रगतशील शिक्षणासाठी त्यांच्या संकल्पनेतून आता होतकरू विद्यार्थ्यांना टॕब वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या टॕबचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना होईल अशी योजना शाळेने आखली आहे.
कार्यक्रमाला समन्वयक कु. सिध्दीका शिंदे, संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल अध्यक्ष श्री . सहदेव सावंत, चिटणीस व समाजसेविका सौ. सुरक्षा घोसाळकर, चिटणीस श्री . यशवंत साटम , मुख्याध्यापक श्री . सिध्दार्थ इंगळे, पर्यवेक्षक श्री . जगदीश सूर्यवंशी, अधिवेशन प्रमुख श्री . राजेंद्र निळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री . विलास रहाटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या भेटीचा सदुपयोग करून शैक्षणिक प्रगतीची ग्वाही दिली.