सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री तुषार ठोंबरे यांची माहिती, गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठलाची तुळशी पूजा भाविकांना करता येणार आहेत.मंदिर समितीच्या वतीने भाविकांना तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून दिली असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री तुषार ठोंबरे यांनी दिली.
भारताची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. मोठ्या यात्रांना तर लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी च्या नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा करण्यात येतात. या पुजांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच भाविकांच्या मागणीनुसार तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कारण नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा शिवाय भाविकांना पूजा सेवा करता यावी म्हणुन तुळशी पूजा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली. त्यानुसार मंदिर समितीच्या दि.15/02/2023 रोजीच्या सभेत भाविकांना तुळशी अर्चन पुजा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला .त्यानुसार चैत्र शुध्द 1, बुधवार दि.22/03/2023 रोजी गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तांवर तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदर पुजा यात्रा, सण, उत्सव इत्यादी दिवस वगळून इतर दिवशी दैनंदिन सकाळी महानैवेद्यापुर्वी, दुपारी पोषाखापूर्वी व सायंकाळी धुपारतीपूर्वी या वेळेत प्रत्येकी दहा प्रमाणे एकूण 30 पुजा उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये एका पुजेसाठी जास्तीतजास्त 5 भाविकांना प्रवेश दिला जाणार असून, त्याचे प्रतिपुजा रू.2100/- देणगी मुल्य राहणार आहे. अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या नित्योपचार विभाग कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.