पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. यशपाल मारुतीराव खेडकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ‘अॅनालिसीस अँड टेस्टिंग ऑफ मॉडीफाईड हायड्रोलिक सेमीअॅक्टीव्ह डेम्पर बाय मॅग्नेटोरहॅलॉजिकल अप्रोच’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधप्रबंध कर्नाटक राज्यातील बेंगलोरमधील जैन विद्यापीठात सादर केला होता. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे महाविद्यालयात त्यांचा सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी मा. शमा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व डॉ.सुनील भट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. खेडकर यांनी पीएच.डी.पूर्ण केली. त्यांना आई सौ.मंदाकिनी खेडकर, वडील मारुतीराव खेडकर, भावंडे, पत्नी सौ.वर्षा खेडकर यांच्यासह स्वेरीच्या इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. खेडकर यांनी सांगितले. ‘स्वेरी’ या संस्थेच्या नावातच 'रिसर्च' हा शब्द असल्याने सुरुवातीपासूनच स्वेरीमध्ये संशोधनास प्रोत्साहन दिले जाते. स्वेरीमध्ये असणारे संशोधनपूरक वातावरण, संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांचे विशेष मार्गदर्शन, विविध संस्थासोबत असणारे सामंजस्य करार, उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधनपर प्रयोगशाळा या सर्व बाबींमुळे स्वेरीतील वातावरण हे संशोधनास अतिशय पोषक बनले आहे.
या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीतील पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांची संख्या वरचेवर वाढत आहे. आज स्वेरीमध्ये सुमारे ३४ प्राध्यापक हे पीएच.डी. धारक असून सुमारे ३० प्राध्यापकांची पीएच.डी. सुरू आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्या उपजिल्हाधिकारी मा. शमा पवार यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, पालक व चारही महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत डॉ.खेडकर यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. डॉ.खेडकर हे स्वेरीचेच विद्यार्थी असून २००९ साली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच त्यांनी याच स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानदानाची सेवा सुरु केली. डॉ.खेडकर हे बालपणापासून वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर मिळवत सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये सन २००८ व २००९ साली त्यांनी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील पटकावला.
स्वेरीतील प्रत्येक कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि शब्दांची उत्तम मांडणी करून अभ्यासपूर्ण संवाद कौशल्याने त्यांनी अनेक कार्यक्रम यशस्वी केले आहेत. जिल्ह्यातील कांही मोजक्या व्यासंगी वक्त्यांच्या पंक्तीत डॉ. यशपाल खेडकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गाढा अभ्यास आणि उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर ते स्वेरीतील विद्यार्थी घडवीत असून गेल्या १४ वर्षापासून ते स्वेरीत ज्ञानदान करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक पद तसेच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचे 'उपक्रम प्रमुख' हे पद देखील त्यांनी भूषविलेले आहे.
पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल डॉ. खेडकर यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.