पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या अधिपत्याखाली २८ परिवार देवतांची मंदिरे आहेत. सदरची मंदिरे सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीमध्ये भाविकांना दर्शनासाठी खुली असतात. पंढरपूर सोलापूर - रोडवरील चंद्रभागा नदीच्या पश्चिमेस श्री अंबाबाई मंदिर आहे. सदर मंदिरामध्ये पूजा अर्चा करणे, स्वच्छता ठेवणे इत्यादी कामे करणेसाठी पुजारी व सेवकांची पूर्णवेळ नियुक्ती केलेली आहे.
आज रविवार, दि.१९/०३/२०२३ रोजी सकाळी ०६ वा. नेहमीप्रमाणे श्री अंबाबाई मंदिर उघडण्यात आले. सकाळी पूजा अर्चा झालेनंतर तेथील पुजारी महेश दिलीप मंजरतकर हे सकाळी ८.३० वा. च्या दरम्यान श्री.अंबाबाई मंदिराच्या परिसरातील स्वच्छतेचे काम करीत होते.
ज्यावेळेस स्वच्छतेचे कामकाज पूर्ण झालेनंतर मंजरतकर हे श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात असताना त्यांना श्री अंबाबाई मातेच्या पितळी पादुका जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पादुकांची ताबडतोब शोधाशोध सुरू केली, त्यावेळी त्यांना एक अज्ञात व्यक्ती मंदिराच्या बाहेरील बाजूस धावत जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंजरतकर यांना त्या व्यक्तीबाबत संशय आल्याने त्याचा पाठलाग करणेस सुरवात केली.पाठलाग करीत असताना सदरची व्यक्ती हि महाव्दार या ठिकाणी सापडली.
सदरच्या अज्ञात व्यक्तीचा शोधाशोध करीत पाठलाग करीत असताना मंजरतकर यांनी धाडस दाखवून मोठया चार्तुयाने व हुशारीने त्या चोरास महाव्दार येथे पकडले व त्याला पकडून सदर बाबतची सविस्तर माहिती वरिष्ठांना दुरध्वनीव्दारे कळवून सदरच्या अज्ञात व्यक्तीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले व त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच अशा प्रकारे पितळी व इतर साहित्यसुध्दा चोरीला जाण्याची शक्यता असल्याने मंदिरे समितीच्या मंदिराबाहेरील २८ परिवार देवतांच्या ठिकाणी कर्तव्यावर व सेवेवर असणाच्या सर्व पुजारी व सेवकांना मंदिराच्या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत खबरदारी घेण्याची व काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.