सोलापूर प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नागुर गावातील बसवराज प्रभू नागोरे यांच्या जवळपास अडीच वर्षे प्रलंबित घरगुती वीजजोडणीच्या मागणीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे न्याय मिळालाय. त्यांनी जुलै 2020 मध्ये घरगुती वीज जोडणी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. मात्र, नागोरे वस्तीमध्ये गावठाण वीजवाहिनी नसल्याने डीपी बसविणे आवश्यक होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नुकताच गेल्या आठवड्यात हा डीपी बसविला गेला. घरगुती वीजजोडणी मिळाल्यानं श्री. नागोरे यांचं घर प्रकाशानं उजळून गेलंय.
बसवराज प्रभू नागोरे पूर्वी नागुर गावात राहायचे. साधारणतः अडीच ते तीन वर्षांपूर्वी ते नागोरे वस्तीवर राहायला आले. त्यामुळे घरगुती वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांनी 7 जुलै 2020 रोजी महावितरणकडे अर्ज केला. गेली अडीच वर्षे ते पाठपुरावा करत होते. मात्र, कुणीही दाद घेत नव्हते. त्यामुळे शेजारी बसवराज दनुरे यांच्यासोबत त्यांनी जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. तसेच, निवेदनाची प्रत पालकमंत्री यांना वैयक्तिकरीत्या पाठवली गेली. खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच दखल घेतल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.
याबाबत बसवराज नागोरे यांचे पुत्र पंकजकुमार नागोरे म्हणाले, पूर्वी आम्ही गावात राहायचे. साधारणतः तीन वर्षांपूर्वी नागोरे वस्तीत राहायला आले. तिथे घरगुती वीज नव्हती. विजेविना आमचे खूप हाल व्हायचे. अर्ज करूनही वीजजोडणी मिळत नव्हती व कुणी दादही घेत नव्हते. त्यामुळे आम्ही घरगुती वीजजोडणी मिळावी, म्हणून पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. आमची ओळख नसतानाही पालकमंत्र्यांनी आमच्या विनंतीची तात्काळ दखल घेतली आणि हा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महावितरणला दिले. गेल्याच आठवड्यात आमच्या वस्तीवर डीपी बसविला गेला आणि आम्हाला घरगुती वीजजोडणीही मिळालीय. आमच्या कुटुंबात आई, वडील माझे व भावाचे कुटुंब असे आम्ही 9 सदस्य आहोत. घरात वीज आल्यामुळे आमचे हाल आता संपलेत. याबद्दल पालकमंत्री महोदय यांचे आम्ही आयुष्यभर मनःपूर्वक ऋणी राहू.
महावितरणचे उपअभियंता संजीवकुमार मेहेत्रे म्हणाले, श्री. नागोरे यांनी घरगुती वीजजोडणी मिळावी, अशा अर्ज केला होता. मात्र, नागोरे वस्तीमध्ये शेतीपंपाची लाईन होती. गावठाण वीजवाहिनी नसल्याने डीपी बसविणे आवश्यक होते. त्यासाठी विशेष घटक योजनेतून 4 लाख 67 हजार रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले. आता नागोरे वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात 16 केव्हीएचा डीपी बसविला असून श्री. नागोरे यांना घरगुती वीज देण्यात आली आहे. नागोरे वस्तीवरील ग्राहकांना आता मागणीनंतर घरगुती वीज देता येऊ शकेल.
एकूणच जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयातून सामान्य माणसांच्या समस्या, अडचणी मार्गी लागत असल्याचे चित्र आहे. सामान्य माणसांच्या अडचणी सोडवल्या जात असल्याने दिलासादायी चित्र आहे.