सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य, नाटिका, नकला, गाणे सादर करून पालकांची मने जिंकली. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित स्नेहसंमेलनात आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रथम संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व कै. बसवराज कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख बी. एन. पाटील, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा अनिता बसुदे, पालक काशीनाथ पाटील , सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, नेताजी शिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख पाटील म्हणाले, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो.राजराजेश्वरी शाळेने विद्यार्थ्यांसाठी नेहमी विविध उपक्रम राबवित असल्याने केंद्रातील एक आदर्श शाळा असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षी सर्व सोयींनी युक्त सुसज्ज शाळेचे इमारत उभारणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतलकुमार पाटील यांनी केले .सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन उज्वला भांड व संगीता नरगिडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून देशाभिमान जागविला.मोबाईल थीमच्या गाण्यातून मोबाईलचे दुष्परिणाम दाखविले.गौरव महाराष्ट्राचा गीतातून महाराष्ट्रातील विविधता दाखवून स्त्री शक्तीचा जागर केला. पाठशाळा गीतातून शालेय जीवन चित्रित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हणमंत कुरे , चंद्रशेखर पाटील , मारुती कांबळे, रेवणसिद्ध दसले विश्वनाथ तंबाके, शितल चमके, सुजाता फुलारी आदींनी परिश्रम घेतले.