पंढरपूर प्रतिनिधी
श्रीसंत साहित्य सेवा संघातर्फे प्रतिवर्षी संत साहित्यातील योगदानाबद्दल देण्यात येणारा २०२३ साठीचा पुरुषोत्तम पुरस्कार ह्या वर्षी संत साहित्याचे उपासक आणि ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे,पुणे ह्यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तेरावे वर्ष असून येत्या रविवार २२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी सहा वाजता ज्ञान प्रबोधिनी उपासना मंदिर,डफरीन चौक सोलापूर येथे ज्ञान प्रबोधिनीच्या प्रमुख विश्वस्त डॉ स्वर्णलता भिशीकर ह्यांचे शुभहस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. सन्मान निधी रू पाच हजार,मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विद्याधर ताठे मूळचे पंढरपूरचे असून दैनिक तरुण भारत पुणेचे दहा वर्षे मुख्य उपसंपादक, एकता, विवेक आणि शिर्डी संस्थानच्या साईलीला मासिकांचे संपादक, संत तुकाराम संतपीठाचे सदस्य, वनवासी कल्याण आश्रमाच्या नागालँड विभागाचे संघटन मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय सेवा कार्य केले आहे.
संत साहित्यावर विविध दैनिकांतून आणि मासिकांचे मधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत शिवोपासना, आद्य पत्रकार देवर्षी नारद, संतकवी श्रीधर स्वामी, संत साहित्यातील राम दर्शन, भेटवा विठ्ठला ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
गेली तेरा वर्षे संत साहित्य सेवा संघ पुरुषोत्तम पुरस्कार संत साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांना देत असून ह्यामध्ये डॉ माधवराव नगरकर,डॉ स्वर्णलता भिशिकर, डॉ इरेश स्वामी,प्रा सरल बाबर, डॉ नरेंद्र कुंटे,डॉ बाबामहाराज तराणेकर,डॉ रा ल जोशी,डॉ अरुण प्रभुणे, डॉ अश्विनी जोग आदि प्रमुख मान्यवरांचा समावेश आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विद्याधर ताठे ह्यांना २०२३ चा पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती श्रीसंत साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सु स देशमुख,कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव संजीव कुसुरकर आणि सहसचिव विश्वास जतकर ह्यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.