सोलापूर प्रतिनिधी
विडी, यंत्रमाग व असंघटीत कामगारांबरोबर बांधकाम व खाजगी अस्थापना कामगारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी देगांव येथील हब्बु वस्ती येथे शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे कार्यालय उद्घाटन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते व जिल्हा अध्यक्ष दिपक गवळी, शहर अध्यक्ष विश्वास नागमोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी श्री. छत्रपती शिवाजी महाराज, श्री. गौतम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पजुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते शहर अध्यक्ष विश्वास नागमोडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पित कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर विष्णु कारमपुरी (महाराज) आपल्या भाषणातून म्हणाले की, जे का रंजिले – गांजिले त्यासी म्हणे आपुले, देव तेथेच जाणावा साधु तोची ओळखावा. या म्हणी प्रमाणे गरीब कामगारांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा असून यासाठी सदर कार्यालयाची उद्घाटन करण्यात आले आहे. म्हणून या परिसरातील व शहरातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार बंधू – भगिनींना या कार्यालयामार्फत आपण आपले न्याय व हक्क मिळवून घ्यावे. असे आव्हान उपस्थित कामगार बंधु – भगिनींना केले.
सदर प्रसंगी जिल्हा अध्यक्ष दिपक गवळी, शहर अध्यक्ष विश्वास नागमोडे यांनी आपले विचार मांडले. सदर उद्घाटन कार्यक्रमास रवि जाधव, दिनेश नागमोडे, बाळासाहेब सोनकांबळे, किर्ती नागमोडे, कविता नवगिरे, वनिता सोनकांबळे, प्रिती जाधव, रविराज सोनकांबळे, विपुल उघडे, करण उघडे, अमोल जाधव, देवराज सोनकांबळे यांच्यासह परिसरातील नागरीक बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.