उदय वाघवणकर जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी पूर्व येथील सदभक्ती मंदिर ते म्हाडा कॉलनी दरम्यान धावणारी वातानुकूलित बस क्रमांक ४४२ ही बस सेवा प्रवाश्यांना त्रासदायक असल्याने तसेच त्या बस मध्ये २१ आसने असल्यामुळे सकाळ संध्याकाळी गर्दीच्या वेळी चढ - उतार करताना वयोवृद्ध, शालेय विद्यार्थ्यांपासून, महिला प्रवाश्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.
बसमधील उभ्या प्रवाश्यांना दाटीवाटीने उभे देखील राहता येत नाही.म्हाडा कॉलनी, पी.एम.जी.पी कॉलनी, दुर्गा नगर, रामवाडी, प्रताप नगर, दत्ता टेकडी, श्यामनगर ह्या मार्गावर ३६ आसने असलेली साधी मिनी बस सेवा सुरू करावी ह्याकरिता सर्वश्री किशोर रेवणकर, वैभव घरत, मनमोहन मुळे, प्राची शिंदे यांनी प्रवाशांच्या सह्याची मोहीम सुरू केली आहे.
सदर सह्यांचे निवेदन मानव विकास संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शरद बनसोडे यांनी नुकतेच बेस्ट व्यवस्थापक यांना दिले असून साधी वातानुकूलित बस ऐवजी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.