ऊद्या ५ नोव्हेंबर रोजी तज्ञ करणार बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये दि. ४ व ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस, बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅसलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप (ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे) या विषयावरील संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानातील व उद्योग विश्वातील तज्ञ मंडळी आज स्वेरीत आले असून त्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे.
ग्रामीण नवकल्पनांना चालना देणे व त्याद्वारे ग्रामीण उद्योजकता विकासास गती देण्याच्या दृष्टीकोनातून स्वेरी मध्ये सोबस सेंटर ऑफ एक्सलंस ची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे ग्रामीण विकासासाठीचे नवनवीन उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवस संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी व्हील्स ग्लोबल फाउंडेशन (युएसए)चे अध्यक्ष सुरेश शेणॉय, मास्टेक चे संस्थापक चेअरमन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष अशांक देसाई, सोबस इनसाइट फोरम, बेंगलोर चे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी यांच्यासोबत व्हील्स ग्लोबल फाउंडेशनच्या १० पेक्षा अधिक मान्यरांचे स्वेरीत आगमन झाले आहे. सर्वप्रथम स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या स्थापनेपासूनचा इतिहास थोडक्यात मांडला.
यावेळी त्यांच्या समवेत संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या सह स्वेरी परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागतानंतर पाहुण्यांनी स्वेरीची माहिती, मिळालेला निधी, विद्यार्थ्यांना येत असलेले यश, शिक्षण पद्धती या बाबींची सखोल माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी स्वेरीज सोबस सेंटर व स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व प्रकल्पांचे भरभरून कौतुक केले.
या प्रदर्शनामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक), फार्मसी व एमबीए मधील विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे प्रदर्शन केले होते. उद्या ( दि.५ नोव्हेंबर ) रोजी सकाळी कॅम्पसमध्ये वृक्षारोपण नंतर मुख्य ओपन थिएटर मध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या संमेलनात स्थानिक नवकल्पनांचे प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर सत्रे आणि जागतिक पातळीवरील प्रख्यात मान्यवरांची चर्चा होणार आहे.
उद्योजकता आणि नवोपक्रमाशी संबंधित ऑन-ग्राउंड कामाची अनुभूती घेणे आणि विविध भागधारकांना भेटून सल्ला मसलत करणे हा या भेटीचा मुख्य हेतू आहे. अमेरिकेतून आलेले पाहुणे, प्राध्यापक वर्ग, स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, नवउद्योजक यांची ओळख व चर्चा होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात भेटीचा आढावा होणार असून त्यानंतर समारोप होणार आहे.
पाहुण्यांसोबत सोबसच्या संचालक रेषा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, ईशान पंत तसेच स्वेरीतील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत.
या निमित्ताने स्वेरी कॅम्पस विद्युत रोषणाईमुळे अधिक खुलून दिसत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने स्वेरीतील शिक्षणाला व संशोधन विभागाला नवीन दिशा मिळणार, हे मात्र नक्की.