सोलापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी जिल्ह्यास भौतिक 46 व आर्थिक रक्कम 127.88 लाख लक्षांक प्राप्त झाले आहे. रोपवाटिका प्रकल्प उभारणीसाठी मूल्य रक्कम रु. 5.55 लाख ग्राह्य धरुन रक्कम रु. 2 लाख 77 हजार 500 (50 टक्के याप्रमाणे) अनुदान अनुज्ञेय आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची 0.40 हेक्टर जमीन व रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट व महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य राहील. तसेच भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करणे आवश्यक आहे.
तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.