पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेंतर्गत कर्ज मागणी अर्ज वितरण दिनांक 29 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, कागदपत्रांच्या पूर्ततेसह 20 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तरी मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा रक्कम रु. 1,00,000/- लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. 85000 (85%), अनुदान रक्कम रु. 10000 (10%), अर्जदाराचा सहभाग रु. 5000(5%) असे एकूण 1 लाख रुपये कर्ज (100%) देण्यात येते. तीन वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 65 लाभार्थींचे रक्कम रु. 65.00 लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजु व होतकरुंनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बिग बजार समोर, सोलापूर येथे मूळ जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रांसह स्वत: उपस्थित रहावे, त्रयस्थांकडे अर्ज दिला जाणार नाही किंवा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या करिता कार्यालयात स्वत: प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे, असे पत्रकात स्पष्ट केले आहे.