सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त तेजज्ञान फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना पंधराशे ग्रंथ भेट देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. व्यासपीठावर प्रशालेचे प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, तेजज्ञान फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. श्रुती मराठे ,अंबादास कस्तुरी, अमरीश कोम्पेल्ल्ली आदी उपस्थित होते.
प्रथम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती व जागतिक वाचन प्रेरणा दिनानिमित्त तेजज्ञान फाउंडेशनच्यावतीने 'विचार नियमाचा आधार, आशा आणि विश्वास ' या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अण्णाराव कुंभार म्हणाले, वाचनाने आपले मन सदृढ व संस्कारक्षम होते. वाचनाच्या सरावाने आत्मविश्वास वाढतो म्हणून विद्यार्थ्यांनी व शिक्षकानी अभ्यासक्रम पुस्तकाव्यतिरिक्त बाह्य साहित्य , आत्मचरित्र, कथा, कादंबरी, गोष्टीचे पुस्तक, मासिके,दिवाळी अंक,वर्तमानपत्र आदी विविध ग्रंथांची अवांतर वाचन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.यावेळी डॉ.श्रुती मराठे म्हणाल्या, आजच्या मोबाईलच्या युगात वाचन साहित्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी व आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने तेजज्ञान फाउंडेशनच्यावतीने ग्रंथ वाटप करण्यात आल्याचे सांगितल्या.
यावेळी राजकुमार मरगुरे, क्रीडा प्रमुख विठ्ठल कुंभार, धर्मराज बळारी, लक्ष्मीकांत त्रिशूले, शिवानंद पुजारी यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीपक नारोणे यांनी केले तर प्रा.अमर दुस्सा यांनी आभार मानले.