पितृपक्ष पंधरवड्यात सोनार परिवाराकडून वृद्धाश्रमास शिधा...!
पंढरपूर प्रतिनिधी
“ भरल्या पोटी मेजवानी देतानाच आपल्या आसपासच्या परिसरातील गरजवंतांचाही विचार व्हावा..” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतर्गत येथील रामकृष्णहरी वृद्धाश्रमामध्ये शिधा वाटपाच्या सामाजिक कार्यक्रमावेळी बोलत होते.
पितृपक्ष पंधरवड्यात घरातील महाळाच्या कार्यक्रमाचे स्वरूप लहान करून उर्वरित रकमेतून रामकृष्णहरी वृद्धाश्रमास मिष्टान्नासाठी शिधा देण्याचा खारीचा वाटा उचलतांना पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - “ समाजातील अधिकाधिक व्यक्तिंनी जर या विचाराचा अंगीकार केला तर आपण, आपले स्नेही, आप्तेष्टांबरोबरच गरजवंतांनाही आनंद मिळेल.”
सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार यांच्या या उपक्रमाचे समाजातील अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे. शिवाय अधिकाधिक व्यक्तिंनी असा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.