वेळापूर प्रतिनिधी तेज न्यूज
फळवणी (ता. माळशिरस) येथे एका अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. अंत्यविधीसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करत एका ग्रामपंचायत सदस्याने मृतदेहाच्या नातेवाईकांना केवळ मज्जावच केला नाही, तर त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मृतदेह तेथून उचलण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मध्यस्थीने हा अंत्यविधी पार पडला.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, फळवणी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी ओढ्यालगतच्या जागेवर गेले होते. मात्र, त्याच वेळी स्थानिक ग्रामपंचायत सदस्याने संबंधित जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगत अंत्यविधी करण्यास विरोध केला. वादावादी दरम्यान संबंधित लोकप्रतिनिधीने मृतदेहाच्या नातेवाईकांना जातीवाचक अपशब्द वापरले आणि मृतदेह तेथून उचलून नेण्यास भाग पाडले.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या
सदर कृत्यामुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी न्यायासाठी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणला. “आम्हाला अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही, तर आता मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोरच जाळू,” अशी भूमिका घेत नातेवाईकांनी तीव्र निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
पोलीस मध्यस्थीने मार्ग
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करून सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर, आशिष कांबळे यांच्या मध्यस्थीने आणि उपस्थितीमध्ये ओढ्याशेजारील जागेवरच अंत्यविधी पूर्ण करण्यात आला.
संताप व्यक्त
एकीकडे गावच्या विकासाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडूनच मृतदेहाचा अपमान झाल्याने फळवणी परिसरात संताप व्यक्त होत आहे. मृत्यूनंतरच्या शांततेच्या प्रसंगी दाखवलेली ही असंवेदनशीलता माणुसकीला शोभणारी नाही, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.

