पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित, विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी MHT-CET-2026 च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ महाविद्यालयात एका दिमाखदार सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदनजी क्षीरसागर यांनी भूषविले. या कार्यक्रमास खजिनदार श्री. सलीमजी वडगावकर , प्राचार्य डॉ. मुंढे यु. आर. उपप्राचार्य शिंदे ई. जी., विभागप्रमुख व्ही. डी. चौगुले हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. मदनजी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, हे यश म्हणजे त्यांच्या जिद्दीचे आणि पालकांच्या संस्कारांचे फळ असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे खजिनदार वडगावकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना कठीण परिस्थितीत आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यश खेचून आणावे असे प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ. मुंढे यु. आर. यांनी आपले मनोगत व्यक्त करताना (PCM) आणि (PCB) अशा दोन्ही गटांमध्ये 36 विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे घवघवीत यश म्हणजे 'विवेक पॅटर्न'च्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचे फलित असल्याचे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात पुरविल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आणि डिजिटलायझेशन याची माहिती सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात विभाग प्रमुख व्ही. डी. चौगुले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून मोलाचे मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. शिंदे ई. जी. यांच्या स्वागतपर भाषणाने आणि प्रास्ताविकाने झाली. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाचा आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील पी. पी. यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी करचे डी. एच. यांनी उपस्थितांचे आभार मानले. या गौरव सोहळ्यास पालक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.


