धाराशिव प्रतिनिधी तेज न्यूज
सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने विविध व्यक्ती, उद्योगसमूह आणि संस्थांविरोधात कोणतीही शहानिशा न करता आरोप करत बदनामी केल्याच्या आरोपांमध्ये चर्चेत असलेले रविराज साबळे पाटील (रा. भूम, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध अखेर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार उद्योग समूह व चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्याविरोधात कथित खोटी, दिशाभूल करणारी आणि मानहानीकारक माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सचिन गंगाराम चौधरी (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली असून ते ओंकार शुगर साखर कारखाना युनिट क्रमांक ७, देवदैठण येथील प्रतिनिधी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी रविराज साबळे पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित करत ओंकार उद्योग समूह आणि बाबुराव बोत्रे पाटील यांच्याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. हे आरोप पूर्णपणे खोटे, अप्रमाणित व समाजात संभ्रम निर्माण करणारे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणतीही खातरजमा न करता व्यक्ती आणि संस्थांविरोधात व्हिडिओ प्रसारित करण्याची पद्धत रविराज साबळे यांची कायम चर्चेत राहिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक वेळा समाजात गैरसमज, अफवा आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याच्या चर्चाही स्थानिक स्तरावर सुरू आहेत.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ओंकार उद्योग समूह महाराष्ट्रासह राज्याबाहेर विविध साखर कारखाने यशस्वीपणे चालवत असून शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार व कर्मचाऱ्यांना वेळेवर मोबदला देण्याचे काम सातत्याने केले जाते. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमही राबविले जातात. असे असताना सोशल मीडियावरून उद्योग समूहाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या व्हिडिओमुळे शेतकरी व कामगारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन उद्योग समूहाच्या विविध युनिट्सवर तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बाबुराव बोत्रे पाटील यांच्याविरोधात बँक फसवणूक आणि हवाला व्यवहारासारखे गंभीर आरोप करण्यात आले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र विस्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


