सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हा प्रश्न श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक तसेच स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या प्रभावी प्रयत्नांमुळे सुटला आहे.
मागील वर्षी रयत शिक्षण संस्थेतील २७ शिक्षकांची विविध पदांवर पदोन्नती झाली होती. मात्र, पदमान्यतेसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया रखडल्याने काही शिक्षकांचे वेतन थांबले होते, तर काही शिक्षकांना पदोन्नतीच्या पूर्वी असलेल्या पदानुसार कमी वेतन दिले जात होते. परिणामी, शिक्षकांमध्ये अनिश्चितता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप यांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर मांडणी केली.
तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासकीय प्रक्रिया यांवर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर अखेर या प्रलंबित प्रश्नाचा मार्ग सुकर झाला. निर्णयानंतर संबंधित शिक्षकांना पदमान्यता मिळाली असून त्यांचे रखडलेले वेतनही मंजूर झाले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्याकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत असून, शिक्षकांनी डॉ. रोंगे यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे.
या प्रसंगी प्राचार्य के. के. जाधव (भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली), प्राचार्य मिसाळ (न्यू इंग्लिश स्कुल, रिधोरे), प्राचार्य केत (रावजी सखाराम हायस्कुल, सोलापूर), प्राचार्य के. डी. शिंदे (न्यू इंग्लिश स्कुल, भाळवणी), प्राचार्य रोकडे (न्यू इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी), प्रा. बाळासाहेब शिंगाडे (विवेकवर्धिनी विद्यालय, पंढरपूर), पर्यवेक्षक एस. जी. जरे (यशवंत विद्यालय, भोसे) व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
शिक्षकांच्या अडचणींना प्राधान्य देत प्रशासनाशी सातत्याने संवाद साधणारे आणि प्रश्न सोडवण्यासाठी ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून डॉ. बी. पी. रोंगे यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
डॉ. रोंगे सरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या मार्च महिन्यापासून प्रलंबित असणाऱ्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदाच्या मान्यतांचा प्रश्न सुटला आहे. ज्यामुळे २७ शिक्षकांना न्याय मिळाला आहे. याबद्दल डॉ. रोंगे सर व शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब यांचे आम्ही आभारी आहोत.
प्रा. के. के. जाधव (प्राचार्य, भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली).


