पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
उमदे गल्ली परिसरात असलेले महाद्वार सबपोस्ट कार्यालय बंद करू नये अशी मागणी परिसरातील खातेधारक, नागरिकांकडून केली जात आहे.
प्रदक्षिणा रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, कालिका देवी चौक, काळा मारुती परिसर, विणे गल्ली येथील आबालवद्ध व सर्वांच्या सोयीसाठी महाद्वार सब पोस्ट कार्यालय उमदे गल्ली येथे सध्या कार्यान्वित आहे. या कार्यालयामध्ये विविध अल्पबचत योजना व बचत योजनांची हजारो खाती व्यवस्थितपणे चालू आहेत. या कार्यालयाची वेळ ही सर्वांना सोयीची अशीच असून येथील व्यवहार सुरळीतपणे चालू आहेत. त्याचप्रमाणे स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर्स व आवर्तक खाते, मुदत ठेव, सेवानिवृत्तांच्या विविध योजना यातून दररोजचे देवाण-घेवाणीचे हजारो रुपयांचे व्यवहार या पोस्ट कार्यालयामार्फत होतात.
मात्र असे असतानाही हे सबपोस्ट कार्यालय विलीनीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. त्याला या परिसरातील नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. याबाबतची निवेदने कार्यालयाला देण्यात आली असून हे विलीनीकरण रद्द व्हावे, अशी मागणी केली जात आहे. महिला, जेष्ठ नागरिक त्याचप्रमाणे महाविद्यालयीन युवक-युवतींना सुद्धा येथून व्यवहार करणे सोयीचे होत आहे. त्यामुळे सदरचे सबपोस्ट कार्यालय बंद करू नये, अशी जोरदार मागणी होत आहे.

