पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी वारी काळामध्ये पंढरपूरमध्ये विक्रमी गर्दी असताना देखील शहरातील महत्वाच्या भागात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून स्वेरीतील विद्यार्थी मदत कार्य करत होते. विद्यार्थ्यांच्या या लक्षवेधी कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. ०३ जुलै ते दि. ७ जुलै २०२५’ दरम्यान पोलीस मित्र या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर मध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी जमले होते. स्वेरीने नेहमीप्रमाणे शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात देखील सहभाग घेत या परंपरेला अनुसरून ‘पोलिस मित्र’ म्हणून पोलिस प्रशासनाला लाख मोलाची मदत केली. हे सामाजिक कार्य करताना स्वेरीतील विद्यार्थी तहान भूक हरवून कार्य करत असल्याचे जाणवले. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून विद्यार्थ्यांनी पोलिस प्रशासनाला अनमोल मदत केली त्यामुळे या कार्याची दखल पोलीस खात्याने घेऊन सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी या सामाजिक कार्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. वाहतूक नियोजन, वारकरी भक्तांचे नियोजन, स्वच्छतेचे आवाहन, स्वच्छता अभियान, डिजिटल डिटॉक्स डे दिंडी, पथनाट्य अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन करून खऱ्या अर्थानी वारी अगदी भक्तिमय आणि आनंदाने पार पाडण्यास स्वेरीतील विद्यार्थ्यांनी मदत केली. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे व डॉ. धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीतील रासेयों मधील सुमारे १८० विद्यार्थ्यांनी पोलीस खात्याला सहकार्य केले. या पाच दिवसाच्या कालावधीत विद्यार्थी गौतम विद्यालय, सांगोला चौक, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रभागा वाळवंट, अंबाबाई पटांगण, पंढरपूर अर्बन बँक व चंद्रभागा बस स्टँड या ठिकाणी गर्दीत उभे राहून वारकऱ्यांना सहकार्य करत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अचानक सर्व ठिकाणी भेट देत असताना स्वेरीतील विद्यार्थी वारकऱ्यांना मार्गदर्शन, मदत कार्यात मग्न असल्याचे जाणवत होते त्यामुळे पोलीस प्रमुखांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांना जवळ घेवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
पाच दिवस मदत कार्य करताना आम्ही वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. आम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होते. त्यांचा आनंदी चेहरा पाहून आमचा उत्साह द्विगुणीत होत होता यातून आम्हाला एक जणू विठ्ठल भेटीचा आनंद मिळाला. – हर्षदा दमगुडे- द्वितीय वर्ष अभियांत्रिकी स्वेरी पंढरपूर