पुणे प्रतिनीधी तेज न्यूज
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली आषाढी वारी आता झपाट्याने बदलत असली, तरी त्यातील आत्मियता आणि जिव्हाळ्याचा भाव कायम असल्याचे मत पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी व्यक्त केले. वारीचे वार्तांकन प्रभावीपणे करण्यासाठी आणि ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात विश्व संवाद केंद्राने आयोजित केलेल्या 'पत्रकार वारकरी' या मुक्त संवादात सूर्यकांत भिसे बोलत होते. शुक्रवार पेठेतील भारत भवन येथे झालेल्या या संवादात पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, सहसचिव राजेंद्रकृष्ण कापसे, सदस्य पावलस मुगुट्मल, छायाचित्रकार मनोज मांढरे, सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेट्ये आणि विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते. पत्रकारितेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींसाठी हा संवाद आयोजित करण्यात आला होता.
गेली ३५ वर्षे वारीचे वार्तांकन करणारे सूर्यकांत भिसे यांनी सांगितले की,"एक तरी वारी प्रत्येकाने अनुभवायला हवी. वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालत, भजन करत वारी केली तरच चांगली बातमी करता येते. त्यातून आत्मीय भाव बातमीत उतरतो. आजच्या पिढीला जीवन समजून घ्यायचे असेल, तर त्यांनी पायी वारी नक्की अनुभवावी." वारी खऱ्या अर्थाने कायिक, वाचिक आणि मानसिक तप आहे, जी वारकऱ्याला कृषी पर्यटन आणि सामाजिक मानसशास्त्राचाही अभ्यास करायला लावून सर्वांगाने समृद्ध करते, असेही ते म्हणाले. वारीतील व्यवस्थापन, आर्थिक बाजू आणि परंपरा याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे यांनी 'ई-वारी'मुळे आषाढी वारी जगभरातील मराठी जनांपर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. टेमघरे म्हणाले, "इंटरनेटमुळे वारीचे वार्तांकन जागतिक झाले आहे. आषाढी वारी हा ऊर्जेचा प्रवाह असून, समाजमाध्यमांतून तो सकारात्मकच जायला हवा." वारीतील अयोग्य बाबींबद्दल वार्तांकन करतानाही भाषा आणि सत्यता पडताळणीचे महत्त्वही टेमघरे यांनी अधोरेखित केले. नव्या पिढीने महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा अभ्यासायला हवा, कारण धकाधकीच्या जीवनात नागरिक पुन्हा अध्यात्माकडे वळत असून, वार्तांकनात आध्यात्मिक 'बीट' तयार होत असल्याचेही ते म्हणाले.
ॲड विलास काटे म्हणाले, "वारी म्हणजे श्रद्धा, त्याग, समर्पण, निष्ठेची अनुभूती आहे. संतांचे चरित्र व्यापक असून त्यांच्या साहित्यात अध्यात्मासोबत विज्ञानही आहे. हीच सकारात्मकता घेऊन वारी जगभरात पोहोचायला हवी आणि जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या संतांचे चरित्र अभ्यासक्रमात असायला हवे."
पावलस मुगुट्मल यांनी वारकऱ्यांचे व्यवस्थापन अलौकिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "प्रत्येक दिंडीचे स्वतंत्र व्यवस्थापन असते. तसेच पालखी आणि संपूर्ण सोहळ्याचेही व्यवस्थापन स्वतंत्र असते. एक प्रकारे ८ ते १२ लाख वारकऱ्यांचे शहर रोज पायी चालत असते."
यावेळी सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे यांनी वारीची माहिती दिली. विश्व संवाद केंद्राच्या संपादक अंजली तागडे यांनी प्रास्ताविक केले. नितीन देशपांडे यांनी वारकरी पत्रकारांचा सत्कार केला. सम्राट कदम यांनी आभार मानले.
आषाढी वारी समजून घेण्यासाठी प्रशिक्षण
वार्तांकनाबरोबरच वारी समजून घेण्यासाठी पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. आषाढी वारीपूर्वी दोन महिने आधी हा प्रशिक्षण कार्यक्रम होईल, अशी माहिती संघाने दिली. वारीतील परंपरा, नियम, वार्तांकनाचे कंगोरे, तंत्र आणि समन्वयाचा यात अभ्यास असेल.