पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
सध्या दुधाचे उत्पादन व मागणी यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे.त्यामुळे दुधामध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ केली जात आहे. अशी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत हरिदास यांनी जिल्हाधिकारी, तसेच जिल्ह्याचे अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दूध हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक आहे. जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत,निरोगी तसेच आजारी, सर्वजण खात्रीचे पोषण म्हणून दूध वापरत असतो परंतु गेली अनेक वर्षे दुधाचे उत्पादन व मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे विविध सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे तरीही ही मागणी पुरवण्यासाठी दूध उत्पादक विविध प्रकारची भेसळ करून ही मागणी पूर्ण करत आहेत.ज्यामध्ये आरोग्यासाठी हानिकारक अशा रसायनांचाही वापर होतो हे दिसून आले आहे वारंवार मागणी करूनही प्रशासन या महत्त्वाच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, हे लक्षात आल्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने संपूर्ण देशामध्ये दूध भेसळी विरोधात जनआंदोलन उभे करायचा निर्णय घेतला आहे.त्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच अन्न प्रशासनाचे अधिकारी यांना निवेदन देऊन याची सुरुवात करण्यात आली आहे.त्याद्वारे सदर भेसळ रोखण्यासाठी तालुका स्तरावर मोफत किंवा अत्यल्प फी घेऊन तपासणी प्रयोगशाळा असाव्यात, तसेच मोबाईल व्हॅनद्वारे अन्नभेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची व्यवस्था करावी,जिल्हास्तरावर अन्नभेसळ रोखणारी समिती गठीत करून, त्यामध्ये ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांचा समावेश करावा, दूध भेसळ हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात यावा. ज्या भागामध्ये अशी भेसळ मोठ्या प्रमाणात आढळते, त्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशा विविध प्रकारच्या मागण्या या पत्राद्वारे करण्यात आले आहेत
जगाला हादरवून सोडणाऱ्या व पूर्णतः नवीन असलेल्या, कोरोना सारख्या रोगाची, तपासणी करता येईल असे तपासणी किट, अत्यंत कमी वेळात संशोधन करून निर्माण केले गेले व सर्व जगामध्ये वापरण्यात आले. खुल्या बाजारातही अत्यल्प किमतीत त्याची विक्री करण्यात आली.परंतु दुधासारखा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संशोधन करून,भेसळ सोप्या पद्धतीने ओळखता येईल, अशा प्रकारचे टेस्टिंग किट का निर्माण केले जात नाही ? याचे मोठे आश्चर्य वाटते. केमिकल क्षेत्रामध्ये कार्यरत कंपन्या आणि संशोधकांनी हे आव्हान स्वीकारायला पाहिजे.दूध दरासाठी ज्याप्रमाणे शासनाकडून अनुदान दिले जाते, त्याच प्रकारे दुधातील भेसळ ओळखण्यासाठी तयार केलेल्या किटला अनुदान देऊन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल,प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख,कोषाध्यक्ष विनोद भरते,जिल्हा सचिव सुहास निकते यांनी केली आहे .