भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शाकंभरी देवी मंदिराच्या सभा मंडपात अधिक मासानिमित्त महाविष्णू याग आयोजित करण्यात आला होता. दशमी एकादशी व द्वादशी अशा तीन दिवस होम हवामानाचा कार्यक्रम सुरू होता. पुणे येथील वेदाचार्य बालाजी कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा याग संपन्न झाला.
या याग विषयी बालाजी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी आहे,यज्ञ हे वेदांचे हृदय आहे, सनातन धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि जगाचे मूळ आहे. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात विविध प्रकारचे यज्ञ केले जातात.
भगवान विष्णू हे श्रेष्ठ महत्वाचे आणि पूजनीय दैवत आहेत. हिंदू धर्मानुसार, जीवनातील सर्व क्रियाकल्प आणि संपूर्ण जगाचे संतुलन व पालन पोषण भगवान विष्णूद्वारे व्यवस्थापित केले जाते. विश्वाचे व्यवस्थापन करणाऱ्या भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विष्णूयाग(पुरुषोत्तम याग) केला जातो.
विष्णु यागाची सुरवात ही पंचगव्य प्राशन विधीने केला जातो हा विधी भक्ताच्या शरीराच्या स्वच्छतेसाठी करावा. या यज्ञामागील उद्देशाला संकल्प असेही म्हणतात. यज्ञाची सुरुवात गणेश पूजनाने होते कारण कोणत्याही अडथळ्याशिवाय यज्ञ पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व विधींमध्ये प्रथम गणपतीची पूजा केली जाते. नंतर पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, भगवान विष्णू मुख्य देवतेचे पूजन, नवग्रह पूजन, रूद्र पूजन व हवन(यज्ञ) केले जाते. यज्ञामध्ये निवडक पवित्र सामग्रीचा वापर केला जातो. यामध्ये संबंधित तज्ञ गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाच्या वैदिक विधींचे पालन करून यज्ञ केला जातो. विष्णु सहस्त्र नाम स्त्रोत्र यामधे भगवान श्रीविष्णूच्या एक हजार नामाचा जप हा विष्णु यागाचा मुख्य भाग आहे.
विष्णु यागाचे लाभ
विष्णु यज्ञाचे बरेच फायदे आहेत, काही खाली नमूद केले आहेत.या यज्ञामुळे नाव आणि कीर्ती व कार्यक्षेत्रात यश मिळण्यास मदत होते.या यज्ञामुळे आरोग्य, संपत्ती आणि शांती या सर्व इच्छा इष्टकामना पूर्ण होण्यास मदत होते.
या यज्ञामुळे भगवान श्रीविष्णूचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते. विष्णू याग महायज्ञा मधे इतके सामर्थ्य आहे की ते जीवनातील सर्व वाईट शक्तींचा नाश करून सकारात्मक जीवन निर्माण करू शकते.या यज्ञामुळे भक्ताच्या कुंडलीतील दोष दूर होण्यास मदत होते.या यज्ञामुळे दुःख दूर होऊन जीवनात आनंद वाढतो.
भगवान विष्णू या विश्वाचे रक्षक मानले जातात, कलियुगात भगवान विष्णूंचे सामर्थ्य महत्वाचे मानले आहे. वेदशास्त्रानुसार पवित्र मंत्रांचा जप हा परमेश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग सांगितला आहे. वेदांमध्ये या सर्व पवित्र मंत्रांचे वर्णन आहे. हा याग आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी व आपल्या जीवनात सकारात्मकताआणण्यासाठी उपयुक्त आहे. भाग्याची देवी विष्णूपत्नी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा भगवान विष्णूंची पूजा केली जाते. विष्णू यागामध्ये (पुरुषोत्तम यागामधे) भगवान विष्णूंचे पूजन केले जाते. विष्णू यागामध्ये विष्णू सहस्त्रनाम, पावमान सुक्त, विष्णू सुक्त, पुरुष सुक्त यांचा जप केला जातो व हवन केले जाते.
ज्या ठिकाणी भगवान विष्णूचीं उपासना, पूजन, नामस्मरण, साधना, हवन केले जाते त्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो.
हा याग संपन्न करण्यासाठी आनंद देशपांडे,नागनाथ निराळी, सुधा निराळी,पुरुषोत्तम निराळी ,सिताराम निराळी, बंडू निराळी, विठ्ठल लिंगे ,महिला, ग्रामस्थांनी प्रयत्न केले.