पालकांनी पाल्यांच्या प्रगतीसंदर्भात प्राध्यापकांशी संवाद साधावा
- पालक प्रतिनिधी दादासाहेब घाडगे
पंढरपूर प्रतिनिधी
‘स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या हिताचे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून ते प्रत्यक्षात अंमलात आणले जात असतात. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे स्वेरी परिवाराचे प्रथम अतिथी असलेल्या पालकांना आमंत्रित करून स्वेरीमध्ये ‘पालक मेळावे’ आयोजित केले जातात. आपला पाल्य हा स्वेरीच्या सहवासात, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कसा घडतो? प्राध्यापक व प्राध्यापिका विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी नेमके काय व कसे योगदान देतात? या बाबतची माहिती प्रत्येक पालकांना व्हावी. तसेच पालकांनी पाल्यांच्या वर्ग शिक्षकांशी, मेंटॉर टीचर्सशी, पाल्य वसतिगृहात राहत असेल तर हॉस्टेल रेक्टर यांच्याशी नियमितपणे सुसंवाद साधला तर त्याचा आपल्या पाल्याच्या जडणघडणीमध्ये नक्कीच फायदा होतो. पालकांनी प्राध्यापकांशी केलेल्या संवादामुळे पाल्याच्या प्रगतीला योग्य दिशा मिळते. यासाठी पालकांनी नेहमी आपल्या पाल्यांच्या प्रगतीसंदर्भात संबंधित प्राध्यापकांशी संवाद साधावा.’ असे आवाहन पालक प्रतिनिधी दादासाहेब घाडगे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये आयोजिलेल्या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी दादासाहेब घाडगे हे स्वेरीतील अनुभव सांगत होते. महिला पालक प्रतिनिधी सौ.वंदना बचुटे म्हणाल्या की, ‘स्वेरीमधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुरक्षा कमालीची असून यामुळे आम्ही पालक वर्ग खूप समाधानी आहोत.’ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या इलेक्ट्रिक समईने कार्यक्रमाची सुरवात झाली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी स्वेरीची व इलेक्ट्रिकल विभागाची अद्ययावत माहिती दिली.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील म्हणाले की, ‘उच्चशिक्षित व अनुभव संपन्न प्राध्यापकांमुळे व प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष या कालावधी मध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे सोलापूर विद्यापीठात स्वेरीने उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही जपल्याचे सांगून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागासाठी असलेले अभ्यासक्रम, उपयुक्त साधने, अवघड वाटणाऱ्या विषयांसाठी अभ्यासाचे जादा तास, विविध शैक्षणिक उपक्रम, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संदर्भ पुस्तके, व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त पुस्तके, गेस्ट लेक्चर्स, या व अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात वाढ होत आहे.’ असे प्रतिपादन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागासंदर्भात प्रा.ए.ए.मोटे यांनी प्लेसमेंटच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल विभागातील उपलब्ध कंपन्यांचा चढता आलेख, मिळणाऱ्या संधी, महावितरण, रेल्वे विभाग यामध्ये असणाऱ्या संधी, झालेले रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट आणि कंपन्याच्या निवडीसाठी स्वेरीकडून होत असलेले प्रयत्न या संबंधी सविस्तर माहिती देवून विद्यार्थी व पालकांची भूमिका काय असावी? याबाबत माहिती दिली.
या पालक मेळाव्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे सर्व प्राध्यापक, समन्वयक प्रा.विजय सावंत व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.श्रेया मोहोळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.धनराज डफळे यांनी आभार मानले.