पंढरपूर प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात विशेषतः तंत्र शिक्षणात विविध पैलू अभ्यासत असताना स्वेरी अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडवत असते. स्वेरी उत्तम शिक्षणाबरोबरच उज्वल भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत असते. त्यामुळे अल्पावधीतच स्वेरीने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक विश्वात तर स्वेरीचे नाव आहेच पण आता स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकात जावून आपल्या विविध स्पर्धांमधील यशातून स्वेरीच्या शिक्षणसंस्कृतीची मोहोर तेथे देखील उमटवली आहे. कर्नाटक राज्यात आयोजिलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये स्वेरी इंजिनिअरींगच्या तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय दर्जा असलेल्या ‘गुरु फेस्ट २०२३’ या स्पर्धेत भरघोस बक्षिसे मिळविली. त्यामुळे स्वेरीने राज्याबरोबरच आता राज्याबाहेर देखील आपला झेंडा डौलाने फडकविण्यास सुरवात केली आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. माणिक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बिदर (कर्नाटक) मधील गुरुनानक देव इंजिनिअरींग कॉलेज मध्ये झालेल्या ‘गुरु फेस्ट २०२३’ स्पर्धेत विविध विभागात यश मिळविले. रांगोळी विभागात प्रथम क्रमांक, टग ऑफ वार आणि प्रश्नमंजुषा या दोन्ही स्पर्धेत दुसरा क्रमांक असे विविध पारितोषक मिळविले.
या स्पर्धेमध्ये स्वेरी इंजिनिअरींगचे श्रद्धा महेश गोरे, ज्ञानेश्वरी नागनाथ गोसावी, श्रुती शशिकांत जाधव, स्नेहल शंकर अंबुरे, रोहिणी बबन भंगरे, अंजुम अन्वरशाह मकानदार, सनुष सुरेंद्र भाटकर, क्षितीजा विकास चव्हाण यांच्यासह ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘सिव्हील इंजिनिअरिंग’ विभागातील तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपली विशेष चमक दाखवली. गुरुनानक देव इंजिनिअरींग कॉलेज संस्थेचे चेअरमन सरदार बलबीर सिंग आणि संस्थेच्या व्हाईस चेअरपर्सन श्रीमती रेश्मा कौर यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.