भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे विचार व जीवनकार्य त्यांच्या पुस्तकांतून समजून घ्यावे - अप्पर जिल्हाधिकारी अॅड.तुषार ठोंबरे
पंढरपूर प्रतिनिधी
‘आपल्या डोक्यावर छत आहे, अंगावर चांगले कपडे आहेत, या ठिकाणी सन्मानाने बसवले जाते आणि विशेष म्हणजे आपल्याला आज हे सर्व शिकण्याची संधी मिळतेय याचे संपूर्ण श्रेय भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना जाते. परंतु शंभर वर्षांपूर्वी डॉ.आंबेडकरांनी वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशाला कायद्याचे ज्ञान देऊ केले. एक माणूस वर्गाच्या बाहेर शिकून या देशाला राज्यघटना देऊ शकतो, देशाला संसदीय लोकशाही देण्याचे महान कार्य करू शकतो तर आपण वर्गात बसून काय काय करायला हवे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जावून बरीच वर्षे झाली असली तरीदेखील आज आपण विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे. जसजसा काळ पुढे जात आहे तसतसे डॉ. आंबेडकर यांचे कार्य तेजोमय होत आहे. आज संपूर्ण जगाला व भारतालाही लोकशाहीसह समतेची आणि बंधुत्वाची गरज आहे. आज तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही जा पण तुम्ही केलेली प्रगती आणि या प्रगतीचा आधार जर ‘जात’ असेल तर तुम्ही केलेली प्रगती आणि विकास मोडून पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज भारतरत्न डॉ.आंबेडकरांच्या पुस्तकांतून त्यांचे विचार व जीवनकार्य हे सर्व स्तरातील नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे.’ असे प्रतिपादन जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. तुषार ठोंबरे यांनी केले.
स्वेरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत अॅड.तुषार ठोंबरे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून डॉ.आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला ‘अन्याय एकीकडे होतो तर दुसरीकडे अन्याय सहन करण्याची मानसिकता आणि यातून एका रत्नाचा जन्म होतो व ते पुढे भारतातीलच नव्हे तर विश्वात आदर्श ठरतात, त्याचं नाव म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. डॉ.आंबेडकर यांनी समाजासाठी प्रचंड संघर्ष करून भरीव योगदान दिल्यामुळे भारतीय लोकशाही बळकट झाली आहे.’ असे सांगून त्यांनी डॉ. आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवला. अप्पर जिल्हाधिकारी अॅड. ठोंबरे यांनी पुढे समाज सेवक, समाज सुधारक आणि समाज क्रांतिकारक यांतील फरक स्पष्ट केला. न्यायव्यवस्था समजण्यासाठी डॉ. आंबेडकरांची पुस्तके वाचली पाहिजेत. तुम्ही अभियांत्रिकी शिकताना अनेक किलोमीटरचे पूल बांधाल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विचार पोहोच कराल परंतु दोन माणसांमध्ये विचारांचे पुल बांधायचे असतील तर सामाजिक विचारधारा समजून घेतली पाहिजे. डॉ.आंबेडकर यांनी आपले आयुष्य अस्पृश्य समाजाच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी वेचले. डॉ.आंबेडकरांनी स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार दिला.' असे अनेक उदबोधक, मार्मिक आणि आवश्यक विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘महापुरुषांचा आदर्श घेण्यासाठी आपण जयंती साजरी करतो. डॉ. आंबेडकर हे असे एकमेव व्यक्ती होते कि त्यांचे अफाट कार्य पाहता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञतेचे सोहळे साजरे केले पाहिजेत. ६५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मोठ-मोठे आणि अवघड प्रश्न सोडविले म्हणून ते आज महामानव आहेत हेच सिद्ध होते.’ यानंतर विविध प्रोजेक्ट व क्रीडा क्षेत्रात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरवण्यात आले तसेच ‘स्वेरीयन’ च्या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी नॅकचे मार्गदर्शक डॉ.संतोष राजगुरू, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, विश्वस्त व श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.