पंढरपूर प्रतिनिधी
खुनाच्या खटल्यामध्ये दिलेल्या साक्षीमुळे झालेल्या शिक्षेमुळे राग मनात धरून पत्नीस जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाप्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा झाली आहे.
मौजे तिसंगी ता. पंढरपूर येथील आरोपी धोंडीराम भिमराव शेळके याने त्याची पहिली पत्नी छबाबाई हिचा खुन केला होता. त्यामध्ये दुसरी पत्नी रंजना हिने साक्ष दिल्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याचा राग मनात धरून रंजना हिचेवर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस भादवि ३०७, ५०४, ५०६ करीता दोषी धरून भादवि ३०७ करीता ५ वर्ष सक्तमजुरी व ५,०००/- हजार रूपये दंड व भादवि ५०४ करीता १ हजार रूपये दंड, भादवि ५०६ करीता २ हजार रूपये दंडाची शिक्षा पंढरपूर येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ चे एम बी लंबे यांनी सुनावली.
यात थोडक्यात हकीकत अशी की, यातील आरोपी धोंडीराम यास त्याने त्याची पत्नी छबाबाई हिचा दिनांक १६/०७/२००१ रोजी खुन केलेला होता व त्या प्रकरणात त्याची दुसरी पत्नी रंजना हिने आरोपीविरूध्द साक्ष दिलेली होती. त्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. ती शिक्षा भोगुन आरोपी येरवडा जेलमधुन सुटलेला होता व ३ महिन्यापासून तिसंगी ता. पंढरपूर येथे मुलाकडे राहणेस होता. परंतु रंजना हिने साक्ष दिल्यामुळे त्याला १४ वर्षाची शिक्षा झाली होती याचा राग मनात होता व तो रंजना हिस तुझे मुळे मला १४ वर्ष जेलमध्ये बसावे लागले असे म्हणत होता.
दिनांक १९/०३/२०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता रंजना ही घरात असताना आरोपीने उसतोडीच्या कोयत्याने तिला जिवे मारण्याचे उददेशाने तिचे डोक्यावर, डोळयाजवळ, डोक्याच्या पाठीमागे वार करून तिला गंभीर जखमी केले व कोयता घेवुन पळून गेला याबाबत फिर्यादी सत्यवान शेळके यांनी आरोपीविरूध्द पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती. त्याप्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हा रजिस्टर नंबर ९२ / २०२१ भारतीय दंड संहिता कलम ३०७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. यात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुखदेव गोदे व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
यात सरकारपक्षातर्फे एकुण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी सत्यवान शेळके, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शरद महादेव पवार, डॉ. बजरंग कृष्णा धोत्रे, डॉ. समीर कुलकर्णी, मपोह मोनिका वाघे तसेच पंच साक्षीदार दशरथ माळी, अमर वाघमोडे, राजेंद्र ढाणे तसेच जखमी रंजना शेळके यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. आरोपीतर्फे झालेली घटना खोटी असून आरोपीस त्याची मुले व पत्नी रंजना सांभाळत नव्हती.
या कारणावरून गावात बदनामी होत होती. त्याला सांभाळु लागु नये म्हणुन खोटी फिर्याद दाखल करून खोट्या गुन्हयात गुंतविले होते. तसेच फिर्याद दाखल करण्यास विलंब झालेला आहे असा बचाव घेण्यात आला. परंतु, सरकारपक्षातर्फे सदर गुन्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीवर असुन यामध्ये फिर्यादी सत्यवान शेळके व त्रयस्थ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शरद पवार जखमी रंजना तसेच वैदयकीय अधिकारी डॉ. धोत्रे व डॉ. कुलकर्णी तसेच इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपुर्ण आहेत. तसेच जखमी रंजना हिचा तोंडी पुरावा व वैदयकीय पुरावा एकमेकांशी सुसंगत आहे. त्यामुळे आरोपीस अशा केसमध्ये गुंतविण्याचे कारण नाही या सगळ्या परिस्थीती व सर्व साक्षीदारांनी एकमेकांना पुरक अशी साक्ष दिलेली आहे.
असा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे करून त्याप्रमाणे झालेला एकंदरीत पुरावा व दोषारोपपत्रातील कागदपत्रे याचे अवलोकन करून आरोपीस भादवि ३०७, ५०४, ५०६ करीता दोषी धरून भादवि ३०७ करीता ५ वर्ष सक्तमजुरी व ५,०००/- हजार रूपये दंड व भादवि ५०४ करीता १ हजार रूपये दंड, भादवि ५०६ करीता २ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून गुन्हयात आरोपी अटक असून त्यास जामीन मिळालेला नाही. त्यामुळे अटक मुदतीतील कालावधी शिक्षेत बजा करण्यात येईल तसेच दंडापैकी ८ हजार रूपये रक्कम जखमी रंजना हिस नुकसानभरपाई म्हणुन देण्यात येईल अशी शिक्षा सुनावली.
यात सरकारपक्षातर्फे अॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले तर पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे पर्यवेक्षण अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, कोर्ट पैरवी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जयशंकर जाधव व पोहेकॉ ३८५ रविंद्र बनकर हे कार्यरत होते.