सोलापुरात विमानसेवा नसतानाही अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर प्रतिनिधी
दि. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान रशियन एलिझारोव्ह सेंटर, आडके हॉस्पिटल सोलापूर तर्फे अस्थिरोग तज्ञांसाठी एलिझारोव्ह तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक आठवड्याचा फेलोशिप प्रोग्राम हॉटेल प्रथम, सोलापूर येथे संपन्न झाला. त्यात भारतातील सर्वच राज्यातून अस्थिरोग तज्ञांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून प्रतिसाद दिला. प्रसिद्ध अस्थिरोग व एलिझारोव्ह तज्ञ डॉ.संदीप आडके यांनी या प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व अस्थिरोग तज्ञांना जगातील अतिप्रगत रशियन एलिझारोव्ह पद्धतीचे प्रशिक्षण दिले.
या पद्धतीमुळे अस्थिरोगातील जवळपास ८० टक्के अतिशय अवघड अशा व्याधींवर अतिशय प्रभावी उपचार शक्य झाले आहेत. त्याचे असंख्य फायदे आहेत परंतु या पद्धतीने शस्त्रक्रिया करणारे अत्यंत कमी अस्थिरोगतज्ञ जगात आहेत. त्यामुळे या पद्धतीचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी डॉ.संदीप आडके सोलापुरात या प्रशिक्षणाचे आयोजन करीत आले आहेत. विशेष म्हणजे सोलापुरात आज विमानसेवा उपलब्ध नसताना सुद्धा भारताच्या सर्व कानाकोपऱ्यातून अस्थिरोग तज्ञांनी यास उपस्थिती लावून वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरची मान उंचावली आहे.
ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी आडके हॉस्पिटलचे डायना अडके व संपूर्ण कर्मचाऱ्यांनी मोलाचा हातभार लावला आहे.