पंढरपूर प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करावे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाची सर्व क्षेत्रीय अधिकारी व सेक्टर पोलिस अधिकारी यांची सांस्कृतीक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अर्जून भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे,तहसिलदार मदन जाधव,अप्पर तहसिलदार तुषार शिंदे, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री निवडणूक नायब तहसिलदार वैभव बुचके तसेच निवडणुक नियुक्त अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची खात्री करण्यासाठी मतदान केंद्राची पाहणी करणे, व्हीएम-1 व व्हीएम-2 संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभेच्या आदर्श आचारसंहीतेचा भंग होणार नाही. आदर्श आचारसंहीतेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यासाठी मतदार संघामध्ये पंढरपूर व मंगळवेढ्यासाठी 4-भरारी पथके, 10-स्थिर सर्वेक्षण पथके, 2-व्हिडीओ पाहणी पथके आणि 4- व्हिडीओ सर्वेक्षण पथके तयार केली आहेत. मतदार संघात पंढरपूर तालुक्यासाठी 13 व मंगळवेढा तालुक्यासाठी 15 असे एकूण 28 क्षेत्र भाग तयार केले आहेत. प्रत्येक (सेक्टर) भागासाठी एक स्वंतत्र क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत पोलिस सेक्टर ऑफीसरची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी पोलिस सेक्टर ऑफीसर यांचा आढावा घेऊन व्हीएम-1 व व्हीएम-2 बाबत मार्गदर्शन केले. तसेच मतदान केंद्रावर होणा-या भविष्यातील अडीअडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले.
नागरीकांनी सुध्दा कोणत्याही आवाहनाला किंवा अमिषाला बळी न पडता मतदान करावे, व शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती
२५२ पंढरपूर विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती वाढावी यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून, आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने लोकसभा निवडणूकीमध्ये 18 वर्षे पुर्ण असलेल्या पात्र नागरीकांची 100 टक्के नोंदणी असावी यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीमध्ये ज्या मतदान केद्रांवर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले आहे अशा मतदान केंद्रावर प्रत्यक्ष नागरीकांमध्ये जाऊन मतदान नोंदणी करुन 100 टक्के मतदान करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
तसेच 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये युवक-युवती यांना मतदार नोंदणी करण्यासाठी तसेच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये 100टक्के मतदान करण्याबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी धनुर्विदया क्रिडा प्रकारात देशपातळीवर प्रतिनिधीत्त्व करणारे श्री विकास मोरे, सुप्रसिध्द गायक श्री मिलिंद शिंदे आणि महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे समाधान घोडके यांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले असल्याचे प्रांताधिकारी इथापे यांनी सांगितले. त्याचबरोबर मतदानाबाबत महाविदयालंयामध्ये विविध कार्यक्रम, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती ,२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन, अंगणवाडी सेविकांची रॅली, महाविदयालयीन विदयार्थ्यांची पथनाटये आदी कार्यक्रमाचे घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.